कट्टीपार व मुंडीपार येथे आधार प्रमाणिकरणास प्रारंभ, जिल्ह्यातील 29053 खातेदार शेतकरी तात्पुरते पात्र

0
258

गोंदिया,दि.24 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्राथमिक प्रमाणिकरणाचा प्रारंभ 24 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे करण्यात आला. या दोन्ही गावातील 156 तात्पुरते पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 29 हजार 53 तात्पुरत्या पात्र खातेदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून अंतिम यादी 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे यांनी दिली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार आणि आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा उपनिबंधक शुध्दोधन कांबळे, प्रभारी तहसिलदार नरेश वेदी, सहायक निबंधक नानासाहेब कदम, आपले सरकार पोर्टलचे जिल्हा व्यवस्थापक मयुर टप्पे हे मुंडीपार येथे तर सहायक निबंधक अनिल गोस्वामी हे कट्टीपार येथे उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. आज या दोन्ही गावातील 156 शेतकऱ्यांची प्राथमिक यादी पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी संबंधीत बँक व ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. या दोन्ही गावातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम युध्दपातळीवर करण्यात आले. आधार प्रमाणिकरण नोंदणीचे करण्याचे काम आपले सरकार केंद्रावर व संबंधीत बँक शाखेत करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आज आधार प्रमाणिकरण केले त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरु झाल्याचे संदेश येत आहे.

आपली कर्जमाफी झाल्याबद्दल काही शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यामध्ये कट्टीपार येथील युवा शेतकरी देवदत्त रहांगडाले म्हणाला, माझ्यावर 27 हजार रुपये कर्ज होते. माझ्याकडे दोन एकर शेती आहे. काही कारणामुळे मी कर्ज भरु शकलो नाही. महाविकास आघाडी सरकारने 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, त्यामुळे याचा फायदा मला झाला आहे. कर्जमुक्ती झाल्यामुळे मी आता चिंतामुक्त झालो आहे. नव्या जोशाने मी पुन्हा चांगली शेती करणार आहे, याबद्दल त्याने सरकारचे आभार मानले.

कट्टीपार येथील भिमराव शेंडे म्हणाले, माझ्याकडे दोन एकर शेती आहे. कॅनरा बँकेचे माझ्याकडे 17 हजार 700 रुपये कर्ज होते. परंतू मागील काही वर्षापासून शेती साथ न देत असल्यामुळे हे कर्ज मी भरु शकलो नाही. सरकारने 2 लाख रुपयेपर्यंतचे कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मी आता कर्जमुक्त झालो आहे. आता नव्याने चांगली शेती करुन मुलांना देखील चांगले शिक्षण देणार असल्याचे ते म्हणाले.

कट्टीपार येथील विरेंद्र तिरेले यांच्याकडे तीन एक शेती असून 58 हजार 450 रुपये कर्ज घेतले होते. परंतू मागील खरीप हंगामातील नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माझ्यावर असलेले कर्ज माफ करण्यात आल्यामुळे पुढे शेती करणे सोईचे होणार आहे. कर्ज माफ झाल्यामुळे मी आनंदी आहे. मुलांचे शिक्षण व शेती करणे सोईचे होईल. याबद्दल सरकारचे विरेंद्र तिरेले यांनी सरकारचे आभार मानले.

कट्टीपारचे सरपंच सुरेश चुटे हे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत बोलतांना म्हणाले, गावातील 57 शेतकऱ्यांची पहिल्याच यादीत कर्जमाफी होत असल्याचा मला आनंद आहे. जिल्ह्यात या योजनेची सुरुवात माझ्या गावापासून झालेली आहे. कर्जमुक्त झालेले गावातील शेतकरी देखील आनंदी असून कर्जमुक्तीमुळे ते तणावमुक्त झाले आहे. त्यामुळे ते मुलांना चांगले शिक्षण देण्यासोबतच चांगले पीक घेण्यास या योजनेचा त्यांना हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.