जिल्ह्यातील उर्वरीत याद्या 28 फेब्रुवारी पर्यंत उपलब्ध होतील – जिल्हाधिकारी दीपक सिंगला

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हयात दोन गावात आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

0
198

गडचिरोली, दि.25 (जिमाका) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) व लखमापूर बोरी (चामोर्शी) येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांचे हस्ते पहिली यादी प्रसिध्द करण्यात आली. यानंतर लगेच गडचिरोली जिल्हयातील दोन गावांमध्ये पथदर्शी स्वरूपात यादी सार्वजनिक करून आधार प्रमाणीकरणास सुरूवात झाली. यावेळी जिल्हयातील पहिले आधार प्रमाणिकरण चामोर्शी तालुक्यातील सखुबाई लहूजी सातपुते यांचे झाले. त्यांनी यावेळी कर्ज स्वरूपातील रक्कम पडताळून ऑनलाईन सहमती दिली. यावेळी चामोशी तहसिलदार संजय गंगथळे, नायब तहसिलदार अविनाश पिसाळ, सहायक निबंधक डी.टी.सरपाते, सहकारी बँकेचे रेहपाडे तर वडसा येथे तहसिलदार सोनवणे, नायब तहसिलदार गुट्टे, सहायक निबंधक संजय सुरजूसे, सहकारी बँक निरीक्षक कुंभारे, कृष्णा केंद्र संचालक भांडारकर इत्यादी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी दोन्ही ठिकाणच्या आधार प्रमाणीकरणाचा आढावा घेवून कामकाजाबाबत विचारपूस केली. यावेळी त्यांनी उर्वरीत सर्व लाभार्थी यांची यादी 28 फेब्रुवारी पर्यंत प्रसिध्द केली जाईल असे सांगितले. पथदर्शी स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या दोन गावांमध्ये प्रथम यादीत 291 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरीक सुविधा केंद्र किंवा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जावून करून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कर्जमुक्ती योजनेतून प्रत्येक कर्जदार लाभार्थी  शेतक-याचा जमीनीवरील पीक कर्जाचा बोजा कमी करण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांसाठी प्रमाणीकरण करण्यासाठी सूचना : लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरीक सुविधा केंद्र किंवा गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जावून करत असताना आधार कार्ड, यादीत नमूद बचत खात्याचे पासबुक, प्रसिध्द यादीमधील नमूद असलेला नंबरचा मोबाईल(ओटीपी करीता), यादीमध्ये आपल्या नावासमोर नमूद असलेला विशिष्ट क्रमांक घेवून जाणे गरजेचा आहे. पोर्टलवरील माहितीत कर्ज रक्कम, आधार क्रमांक किंवा इतर विसंगती असल्यास पोर्टलवर असहमतीचे बटन दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतो.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे म्हणाले.  या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 16 हजार 238 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित  83.75 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून २८ तारखेपर्यंत त्यांच्या याद्या उपलब्ध होतील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखेत प्रदर्शित केल्या जातील, असेही ते म्हणाले.

नंदू नरोटे, वडसा, योजनेचे लाभार्थी : या कर्जमुक्ती योजनेतून माझे 34,518 रूपये कर्ज माफ होत आहे, शासनाचे मी आभार व्यक्त करतो. या प्रक्रियेमध्ये खुप सुलभता आहे. माझे प्रमाणीकरण पुर्ण झाले. या योजनेतून नक्कीच पुढिल खरीप हंगामासाठी कर्जमुक्ती मिळाल्यामुळे पीककर्ज घेता येईल.