मार्कंडा ( देव ) यात्रेत बाल संरक्षणाबाबत जनजागृती

0
56

गडचिरोली,दि.25ः-विदर्भाची काशी म्हणून सुप्रसिद्ध असणारे गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महायात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेत जिल्हाभरातून तसेच बाहेर राज्यातून लाखो भाविक या यात्रेत दर्शनासाठी येतात.याचे औचित्य साधून जिल्हा पोलीस प्रशासन,जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व चाईल्ड लाईन 1098 गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने यात्रेत येणाऱ्या बालकांकरिता मदत केंद्र व जनजागृती स्टॉल  लावण्यात आले होते.तसेच विविध विषयावर जनजागृती करण्यात आली. यात्रेत हरवलेल्या बालकांना वेळेवर त्यांचे आई वडील मिळावे तसेच व बालकास आवश्यक मदत वेळेवर उपलब्ध होण्याच्या हेतूने बाल मदत केंद्र स्थापन करण्यात आले होते.या स्टॉलच्या माध्यमातून चाईल्ड लाईन म्हणजे काय,चाईल्ड लाईनचा उद्देश कार्य,चाईल्ड लाईन 1098 या राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकाचा वापर केव्हा आणि कसा करावा तसेच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बाल लैंगिक शोषण, बाल विवाह,बाल मजुरी,बालकांचे अपहरण,बालकांना नाहक मारहाण करणे,बालकांना भीक मागण्यास प्रवृत्त करणे अश्या अनेक समस्यावर मार्गदर्शन करण्यात आले.बाल संरक्षणार्थ असलेले कायदे यात बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम ( सुधारित 2019 ) बाल विवाह प्रतिबंधक कायदा, बाल संरक्षणार्थ कार्यरत बाल न्याय मंडळ,जिल्हा बाल कल्याण समिती यांची कार्य तसेच बाल संरक्षणार्थ काम करणाऱ्या शासकीय अशासकीय संस्था याबाबत सविस्तर माहिती दिली.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यान्वित योजना बाबत ची माहिती स्टॉल च्या माध्यमातून यात्रेत येणाऱ्या भाविकांना देण्यात आली.जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे आदेशान्वये अतुल भडांगे जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात सदर स्टॉलचे नियोजन करून अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली,दिनेश बोरकुटे जिल्हा प्रकल्प समन्वयक चाईल्ड लाईन गडचिरोली,कवीश्वर लेनगुरे,प्रियंका आसूटकर बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली यांनी मार्गदर्शन केले.यशस्वितेकरिता चाईल्ड लाईन गडचिरोलीचे दिनेश जुळा,पंकज कोडाप,बंडू रायसीडाम, तर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे श्री निलेश देशमुख, रवी बंडावर, इतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.