वाशिम, दि. २7 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार मार्च २०२० महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, २ मार्च २०२० रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार दाखल करून किमान ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही तक्रार निकाली निघाली नसल्यास संबंधितांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकरिता तक्रार दाखल करता येईल. याकरिता विहित नमुन्यातील अर्जासह तालुका लोकशाही दिनातील तक्रारीचा टोकन क्रमांक व दिनांक व आवश्यक कागदपत्रे जोडून दोन प्रतीत तक्रार अर्ज दाखल करावा. जिल्हास्तरावर अर्ज करताना तहसीलदार याचे उत्तरासह तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्राच्या प्रति न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
ज्या नागरिकांना जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या सभेत हजर राहण्याचे पत्र मिळाले आहे व जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आतापर्यंत ज्यांच्या तक्रारी निकाली निघाल्या नाहीत, अशाच नागरिकांनी २ मार्च रोजी होणाऱ्या लोकशाही दिनास उपस्थित रहावे. अर्जदार गैरहजर राहिल्यास प्रकरण वगळण्यात येईल. ज्या नागरिकांनी ई-लोकशाही कक्षामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी २ मार्च रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.
लोकशाही दिनामध्ये विहित नमुन्यातील अर्जाद्वारे तक्रार सादर करणे आवश्यक आहे. या अर्जाचा नमुना लोकशाही कक्षात विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येईल. लोकशाही दिनात दाखल करावयाची तक्रार ही वैयक्तिक स्वरुपाची असावी, सार्वजनिक स्वरुपाची तक्रार लोकशाही दिनामध्ये दाखल करता येणार नाही. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व प्रकरणे, अपील, सेवाविषयक,आस्थापनाविषयक तक्रार लोकशाही दिनात स्वीकारली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
ई-लोकशाही दिनात ऑनलाईन तक्रार दाखल करता येणार
पीक कर्जे, पंचायत समिती, तहसील कार्यालय, महिलांवरील अत्याचार, शिष्यवृत्तीविषयक, भ्रष्टाचार विषयक, नगरपरिषदसह इतर शासकीय-निमशासकीय कार्यालयाच्या संबंधित तसेच सार्वजनिक विषयाच्या तक्रारी ऑनलाईन स्वीकारण्याची सुविधा ई-लोकशाही कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामध्ये नागरिक ८३७९९२९४१५ या व्हॉटसअप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर तसेच ०७२७५-१०७७ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.