भंडारा,दि.27:- बोली भाषेच्या विकासामुळे प्रमाण भाषा समृध्द होत असतात. मराठी भाषा ही अनेक बोली भाषांची भाषिक कौशल्य असलेली समृध्द भाषा असून अलिकडच्या काळात इंग्रजीच्या अती वापरामुळे मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव अधिक प्रमाणात जाणवतो. इंग्रजी भाषा ही जागतिक व्यवहाराची भाषा म्हणून व्यवहार्य असली तरी मराठी भाषेची अस्मिता व गोडवा जोपासणे गरजेचे असल्याचे मत माजी प्राचार्य गुरुप्रसाद पाखमोडे यांनी व्यक्त केले.
वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रज्वलन करुन जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांनी केले. प्रगती महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर, कवी प्रमोदकुमार आणेराव व जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
मराठी भाषेला शेकडो वर्षाचा इतिहास असून मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहचले आहे. अशा वेळी मराठी भाषेला उतरती कळा लागली असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही, मात्र जागतिक संगणकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या अती वापरामुळे तसेच मराठी बोलण्याच्या संकोचामुळे मराठीचा वापर कमी होतांना दिसत आहे. दोन मराठी व्यक्ती आपआपसात इंग्रजी किंवा हिंदी संभाषण करतात अशा वेळी हा धोका अधिक संभवतो. भाषेच्या कक्षा विस्तारतांना आपली भाषेची समज व अज्ञान वृध्दींगत करणे आवश्यक असल्याचे मत पाखमोडे यांनी यावेळी व्यक्त केले.
मराठी भाषा ही जनसामान्यांची भाषा असून संत साहित्याने मराठी समृध्द करण्याचे काम पुर्वापार केले आहे. मराठी भाषा ही मुळातच अविजात भाषा असून मराठीला शेकडो वर्षाचा इतिहास असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. संत साहित्यातून सुध्दा बोली भाषेचा गोडवा आपणास पाहावयास मिळतो. बोलीभाषा व व्यवहार्य भाषा वेगळया असल्यातरी त्यांचा उगम एकच असतो. बोलीभाषेतील साहित्य मोठया प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे निदर्शनास येते. भाषा भेदाभेद मानत नसून अभिव्यक्ती हा एकच उद्देश भाषेचा असतो. मराठी भाषेची अस्मिता टिकावी यासाठी आपल्या व्यवहारात मराठीचा वापर अनिवार्य करण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा, असे आवाहन डॉ. जयश्री सातोकर यांनी आपल्या व्याख्यानात केले.
भाषेचा इतिहास व संस्कृती विषद करतांना प्रमोद आणेराव यांनी अनेक संदर्भ दिले. मरहटी ते मराठी असा भाषेचा प्रवास उलगडतांना त्यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले. बारा मैलावर बोली बदलत असली तरी भाषा ही कायम असते भाषेचा गोडवा प्रत्येकानी जोपासण्याची गरज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आहे, असे त्यांनी सांगितले. दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर आवश्यक असल्याचे सांगून आणेराव म्हणाले की, अनेक संशोधकांनी मराठी भाषा ही दोन हजार वर्षापूर्वीची भाषा असल्याचे सिध्द केले आहे. त्यासंबंधीचे शिलालेख व एैतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. या आधारे मराठीला अविजात भाषेचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानासोबतच समज सुध्दा व्यापक करावी, असे ते म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यांचे या प्रसंगी भाषण झाले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे यांची मराठी भाषा गौरव दिनाच्या आयोजनाची भूमिका प्रास्ताविकातून विषद केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारतीय ज्ञानाचा खजिना या पुस्तकाची भेट देण्यात आली.कार्यक्रमाचे संचलन व आभार संजय नारनवरे यांनी केले. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यावेळी मोठया संख्येनेउपस्थित होते.