गडचिरोली , दि. २७ : : जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिवाजी माध्यमिक शाळा गडचिरोली येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजारा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी आपली मातृभाषा ही आपल्या भावना व विचार चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी वापरावीच लागते असे प्रतिपादन केले. कोणतेही विचार व लेखन मांडण्यासाठी आपण सहजतेने तिचा वापर करू शकतो. म्हणून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी आपण जास्तीत जास्त वापरली पाहीजे असे ते पुढे म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक रघुवेंद्र मुनघाटे, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर पी निकम, प्राचार्य ज्ञानेश्वर मामीडवार, उपमुख्याद्यापिका उषा गोहणे उपस्थित होते.
यावेळी ग्रंथ दिंडीचा शुभारंभ जिल्हा माहिती अधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.शुभारंभावेळी ग्रंथ दिंडी शिक्षणाधिकारी प्राथमिक रघुवेंद्र मुनघाटे, शिक्षणाधिकारी माध्यमिक आर पी निकम यांनी खांदा देवून मार्गस्थ केली. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनीचा शुभारंभ करण्यात आला. या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्मिण होण्यासाठी विविध चांगले ग्रंथ ठेवण्यात आले होते. तसेच मराठी भाषा दिन निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना शिक्षणाधिकारी माध्यमिक आर पी निकम यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या विविध ग्रंथ व नाटकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाचन उपयोगी पडत असल्याने वाचन हा गुण मुलांनी स्विकारणे गरजेचे आहे असे ते यावेळी म्हणले. शिक्षणाधिकारी प्राथमिक रघुवेंद्र मुनघाटे यांनी शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची केल्याने आता मराठी भाषेला ज्ञान भाषा होण्यासाठी चालना मिळेल असे प्रतिपादन केले. त्यांनी मुलांना यावेळी इंग्रजी ने मराठी भाषेला वेढले आहे, आपण मराठीत इंग्लिशचा वापर करून दोन्ही भाषांना न्याय देत नाही असे सांगितले. मराठी भाषा ही मातृभाषा आहे, तिचा वापर गरजेचा असून ती आपणाला जोपासण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या निवडक विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये ज्ञानेश्वर मामीडवार यांनी उपस्थितांचे स्वागत करून मराठी गौरव दिनाचे महत्व सांगितले. तर उपस्थितांचे आभार प्रा.ताजने यांनी मानले. यावेळी विस्तार अधिकारी गेडाम, प्रा. अनिल धामोडे व इतर प्राध्यापक उपस्थित होते .