चंद्रपूर जिल्हा ओबीसी अस्मिता रथयात्रा 2 मार्चला

जिल्हाभरात करणार जागृती; सचिन राजुरकर यांचे नेतृत्व ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याची प्रमुख मागणी

0
78

चंद्रपूर  दि. २७ : :ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीला घेवुन राष्ट्रीय ओबीसी महासंघ निवेदन, अधिवेशन, आंदोलन, यात्रा या माध्यमातून शासन दरबारी रेटा लावत आहे. ओबीसी चंद्रपूर जिल्हा अधिवेशनानंतर नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील अकरा युवक चंद्रपुर ते शिवनेरी पायदळ वारी करुन आले आहेत. याच टप्प्यातील एक उपक्रम येत्या 2 मार्च पासून सुरु होत आहे. 2021 मधे होवू घातलेल्या राष्ट्रीय जनगणनेत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी तथा याबाबत समाजात जनजागृती व्हावी, या ऊद्देशाने “ओबीसी अस्मिता रथयात्रा” चंद्रपूर ते चिमुर काढण्यात येत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर या रथयात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
या रथयात्रेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाची चंद्रपूर जिल्हा शाखा, चंद्रपूर ओबीसी महिला शाखा, चंद्रपूर ओबीसी विद्यार्थी व युवक शाखा, चंद्रपूर ओबीसी अधिकारी-कर्मचारी शाखा यांचा सहभाग असणार आहे.
सदर यात्रा स्थानिक जनता कॉलेज चौकातून 2 मार्चला निघणार असुन बल्लारशहा (2 मार्च), पोंभुर्णा (3 मार्च), मुल (4 मार्च), गोंडपिपरी (5 मार्च), राजूरा (6 मार्च), जिवती (7 मार्च), कोरपणा (7 मार्च), भद्रावती (8 मार्च), वरोरा (11 मार्च), सिन्देवाही (12 मार्च), सावली (13 मार्च), नागभिड (14 मार्च), ब्रन्मपुरी (15 मार्च), या मार्गे 16 मार्च ला क्रांतीभुमी चिमुर येथे पोहोचत आहे.
यात्रेच्या समारोपाला चिमुर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्यामकांत लेडे आदी उपस्थित राहणार आहेत.
या रथयात्रेमधे ओबीसी समाजाने सहभागी व्हावे व आपल्या बहूसंख्येची ताकद दाखवावी, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शाखा चंद्रपूरने केले आहे.