विद्यार्थ्यांनो, जग जिंकण्याची इच्छा ठेवा-संजय वनवे

0
54

लाखनी,दि.28ः-करिअर बनवण्याच्या दृष्टीने आज विविध क्षेत्र उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये काही मोजके क्षेत्र जगाला किंवा आपल्याला माहिती होते. आज अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधीनिर्माण, व्यवस्थापन, शिक्षण, कायदा, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये आजचा विद्यार्थी आपलं करियर निवडू शकतो मात्र हे करत असताना आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रात आपण जग जिंकू शकू अशी क्षमता आपण स्वतःमध्ये तयार केली पाहिजे असा प्रेरणादायी संदेश लिटिल फ्लावर स्कूल चे संचालक श्री संजय वनवे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलताना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्या आशा वनवे तर प्रमुख अतिथी म्हणून आशिष बडगे, प्रशांत वाघाये, प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री संजय वनवे म्हणाले की करिअर निवडणे हा माणसाच्या आयुष्याचा एक भाग झाला, मात्र त्याचसोबत समाजामध्ये आपण एक चांगला व्यक्ती बनणे हे देखिल तितकेच महत्त्वाचे असल्याचं त्यांनी विशेषत्वाने नमूद केलं आणि करिअर म्हणून काही मोजक्या क्षेत्रांकडे न बघता कला, क्रीडा अशा क्षेत्रांकडे देखील बघायला पाहिजे असे सांगत त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य आशा वनवे यांनीदेखील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि होऊ घातलेल्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि आजवर ज्या पद्धतीने शालेय परीक्षा, कला, क्रीडा, सांस्कृतिक व अन्य ठिकाणी ज्या पद्धतीने शाळेने यश संपादन केलेले आहे तसेच घवघवीत यश शाळा इयत्ता दहावीच्या निकालात देखील संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मंचावर उपस्थित आशिष बड़गे, प्रशांत वाघाये यांनी तसेच सर्व शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी पेजल भुरे हिने तर प्रास्ताविक वर्षा पंचबुद्धे यांनी आणि आभार प्रदर्शन आर्यन खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व व शिक्षक वृंद व इयत्ता नववीचे विशेष सहकार्य लाभले.