सण, उत्सवात ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापरण्यास सवलत

0
244

वाशिम, दि. २८ : ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमामध्ये दिलेल्या ध्वनी मर्यादेचे, तरतूदीचे नियमांचे तसेच मा. उच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, या अटीस अधीन राहून वाशिम जिल्ह्यात सन २०२० मध्ये सण, उत्सवाच्या काळात १० दिवसांसाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराकरीता सकाळी ६ वा. ते रात्री १२ वा. या वेळेत सवलत जाहीर करण्यात आली आहे.

या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव काळात १४ एप्रिल २०२० रोजी एक दिवस, गणपती उत्सवात गणपती स्थापनानिमित्त २२ ऑगस्ट २०२० रोजी आणि गणपती विसर्जनानिमित्त १ व २ सप्टेंबर २०२० असे तीन दिवस, नवरात्री उत्सवात अष्टमीनिमित्त २४ ऑक्टोंबर २०२० व नवमीनिमित्त २५ ऑक्टोंबर २०२० हे दोन दिवस, दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजननिमित्त १४ नोव्हेंबर २०२० रोजी एक दिवस, नाताळनिमित्त २५ डिसेंबर २०२० रोजी एक दिवस आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी एक दिवस असे एकूण १० दिवस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराकरीता सवलत जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. तसेच राष्ट्रीय सण-उत्सव आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार व विनंतीनुसार महत्वाच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ५ दिवस राखीव ठेवण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.