मार्गदर्शक, जिप्सी चालकांना बारावी अन् भाषा ज्ञानाचे बंधन

0
148

चंद्रपूर,दि.01 मार्चः-जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नव्याने मार्गदर्शक व जिप्सी चालक व्हायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण असणे आणि हिंदी, मराठी भाषेसह इंग्रजीचेही पुरेसे ज्ञान असणे बंधनकारक असणार आहे. तशी नवी नियमावलीच प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांनी तयार केली असून, या नियमावलीचे पालन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती ताडोबाचे विभागीय वनाधिकारी एस. भागवत यांनी दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश-विदेशातील पर्यटक मोठय़ा संख्येत येतात. त्यामुळे त्यांचे स्वागत योग्य पद्धतीने व्हावे, त्यांना संभाषण करताना अडचण जाऊ नये, यासाठी ही नियमावली तयार करण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले. नव्या नियमात, मराठी आणि हिंदी या भाषेत उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य तसेच इंग्रजीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचे वय २१ वर्षे पूर्ण असावे तसेच तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण असावा, हेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्याने कधीही वन कायद्याचे उल्लंघन केलेले नसावे, अशा अटींचा समावेश असून, वन जमिनीवर अतिक्रमण केले नसल्याचे हमीपत्र देण्याची सक्ती करण्यात आली आहे.
ताडोबा प्रकल्पात सध्या नवे मार्गदर्शक किंवा जिप्सीचालकांची निवड केली जाणार नाही. उत्तम व्यक्तींची निवड व्हावी, यासाठी ही नियमावली तयार करण्यात आली आहे. ताडोबा प्रकल्पातील गावांतील युवकांची निवड केली जाईल. त्यामुळे संबंधित गावांतील युवकांना रोजगार गमवावा लागण्याचा प्रश्नच येत नाही. सद्यस्थितीत जे कार्यरत आहेत. त्यांना कामावरून कमी केले जाणार नाही. ही नियमावली केवळ नवीन गाईड्स व जिप्सीचालकांसाठी राहतील, असेही भागवत म्हणाले