भंडारा,दि.01ः-कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या शेतशिवारात पिकांची जागल करण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर वन्यप्राण्यांनी हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी खोल पाणी असलेला नाला पार करण्याच्या प्रयत्नात पाय अडकल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ढिवरवाडा गावाजवळील शेतशिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली. कोका अभयारण्याच्या वतीने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ २५ हजारांची आर्थिक मदत देण्यात आली.
हरिश्चंद्र राऊत (५२) रा. ढिवरवाडा असे मृतकाचे नाव आहे. ढिवरवाडा हे गाव कोका अभयारण्याला लागून आहे. गावात व शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस ही नेहमीचीच बाब झाली आहे.
हरिश्चंद्र राऊत यांची कोका अभयारण्याशेजारी दोन नाल्यांच्या मधोमध ४ एकर शेती आहे. शेतात गहू व हरभर्याचे पिक आहे. शुक्रवारी (दि.२८) सकाळी ते शेतावर गेले. दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी शिदोरी घेऊन शेतावर गेली. परंतु, ते दिसून आले नाही. संध्याकाळपर्यंतही ते घरी न आल्याने त्यांची शोधाशेध सुरू झाली. रात्रीला पोलिस व वनाधिकार्यांना माहिती देण्यात आली. आज, शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह नाल्यात मिळाला. पिकाची पाहणी करीत असताना दबा धरुन बसलेल्या वन्यप्राण्यांनी हल्ला केल्याने जीव वाचविण्याच्या प्रयत्नात नाला ओलांडत असताना पाय अडकून नाल्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती शेतकरी व ग्रामस्थांनी दिली.
घटनास्थळी सहाय्यक वनसंरक्षक सावंत, माजी आमदार चरण वाघमारे, वासूदेव बांते, जि.प. सदस्य सरिता चौरागडे, के.बी. चौरागडे, सरपंच धामदेव वनवे, भगवान तिजारे, कोकाचे वनपरिक्षेत्राधिकारी सचिन जाधव, करडीचे ठाणेदार निलेश वाजे आदींनी भेट दिली. वन्यजीव विभागाने मृतकाच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन तात्काळ २५ हजारांची मदत मिळवून दिली. मृतकाच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.